मासिक पाळी समज व गैरसमज !लेखन -सोनाली छगन भनगडे

पर्यवेक्षिका,महिला व बालकल्याण विभाग

मोबा - 9665480563


अकोले - पाळी आली आहे ना ? मग मंदिरात नको जाऊ,देवघरात नको जाऊ, प्रसाद नको खाऊ, कोणाला शिवायचं नाही, स्वयंपाकघरात शिरायचे नाही, चार पाच दिवस वेगळं रहायच,आणि खूप महत्त्वाच म्हणजे लोणच्याच्या बरणीला हात लावायचा नाही कारण ते नासेल (बाकी काही नाही पण लोकांचे विचार नासलेत) पाचव्या दिवशी पाळी थांबली की अंघोळ करायची आणि शुद्ध व्हायचं.


      ओ गाॅड....बस,बस,बस.... वैताग आला आहे. या त्याच त्याच रटाळवाण्या गोष्टी ऐकून. कमाल वाटते या सगळ्याची ! 21व्या शतकात वावरताना आजही हे सर्रास चालत. गावामध्ये तर हे चालतचं पण शहरातल्या वन रुम किचन  मध्येही असेच प्रकार घडतात.अस्पृश्य असल्यासारखी वागणूक दिली जाते. त्यात दुर्दैव म्हणजे अगदी उच्च शिक्षित महिलाही हे सारं खपवून घेतात. सणवार आणि समारंभाच्या टाईमटेबलनुसार शरीराचही टाईमटेबल अँडजस्ट केलं जातं. समजा नसेलच होत अँडजस्ट तर   लग्न,समारंभांना जाणं म्हणजे गैर ! मला आजही आठवतयं लग्नकार्यासाठी मैत्रीण गावी गेली होती पण लग्नाच्या सकाळीच तिला पाळी आली. त्यामुळे अशा परिस्थितीशी सामना तिने केला आहे.राहण्यापासून ते जेवनापर्यंत सर्व वेगळं पहिलाच अनुभव आला होता. दुसऱ्याच्या घरी जाऊन विरोध तरी कसा करणार ती ? हे सुद्धा कळत नव्हत. ही वेळ अनेक महिलांवर येते पण अशी वेळ महिलांवर का यावी? याचा विचार केला पाहिजे.
     मासिक पाळी हा महिलांच्या जीवनातील फार महत्त्वाचा भाग आहे. जोवर स्रीला पाळी येत नाही तोवर तिला पूर्णत्व नाही अशी समाजात धारणा आहे. त्यामागील कारण म्हणजे, पाळी आल्याशिवाय स्त्रीला मातृत्व प्राप्त होत नाही. इतकी महत्त्वाची असलेली ही मासिक पाळी आजही अंधश्रद्धेने ग्रासलेली दिसते.मासिक  पाळी म्हणजे काहीतरी घाण अशी भावना खेड्यापासून शहरापर्यंत सहज आढळून येते .पाळी आली कि घराच्या बाहेर राहणं हे दृश्य ग्रामीण भागात सहज दिसत.त्यातच त्या स्त्रीचा कुठे चुकून स्पर्श झालाच तर ती जागा पाणी टाकून धुतली जाते .किंवा त्यावर गोमूत्र टाकण्यात येते.मासिक पाळी म्हणजे चार - चौघात न बोलण्याचा विषय .त्यामुळे पाळीविषयी खुलेआम चर्चाच होत नाही .केमिस्टकडे सॅनिटरी नॅपकिन दबक्या आवाजात मागितला जातो .केमिस्टवालाहि अगदी सॅनिटरी नॅपकिन कागदात गुंडाळून देणार कशाला हवी येवढी लपवा - छपवी ? मुंबई सारख्याच शहरात हि परिस्थिती म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे .मासिक पाळी सुरु होणं म्हणजे दर महिन्याला महिलांच्या गर्भाशयात पेशी आणि रक्तवाहिन्यांच एक अस्तर तयार होणं .आपण सर्वजण जन्माला आलो आहोत ते या अस्तराच्या कृपेमुळेच आणि त्यालाच आपण अपवित्र ,अशुद्ध आणि विटाळ मानतो. नैसर्गिक क्रियेचा एवढा बाऊ का करावा ? ज्या क्रियेमुळे स्त्रीला मातृत्व लाभलं ,त्याच काळात तिला अशी वागणूक का द्यावी ? परमेश्वरानच जग निर्माण केलं म्हणता मग त्याच जगाचा इतका महत्वाचा भाग अस्पृश्य कसा ठरेल ? देव जर सर्वव्यापी असेल त्याला महिलांचा स्पर्श कसा टाळता येऊ शकतो ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.                                                   मासिक पाळी हा एका स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे .एक नैसर्गिक क्रिया आहे . या क्रियेमुळे स्त्रीला मातृत्त्व लाभत .मग या क्रियेला अशुभ आणि पाप माननं योग्य नाही . अशा रूढी -परंपरांच्या नावाखाली स्त्रियांची कुचंबणा केली जाते .आपण आज खऱ्या अर्थाने स्त्री - पुरुष समानता मानतो ,तर या चुकीच्या समजुतीतून बाहेर येन गरजेचं आहे .            


खेडेगावांमध्ये तर याहून भयानक परिस्थिती आहे .आधीच पाळी संदर्भात बुरसटलेले विचार त्यात स्वच्छतेचा तर खूप मोठा प्रश्न .मासिक पाळी विषयातलं अज्ञान आणि स्वच्छते संदर्भात माहिती नसल्यानं अनेक महिलांना इन्फेकशन होत .अनेक महिलांना योनीमध्ये जंतुसंसर्ग ,गर्भाशयाचे आजार झालेत. खेड्यामध्ये हा प्रश्न खूपच मोठा आहे .ग्रामीण भागात आजही महिला त्या चार दिवसांत कापडचं वापरतात .एकच कापड धुऊन पुन्हा पुन्हा वापरलं जात .ते कापड कुठे तरी मग अंधारात किंवा कपड्याच्या आत दडवून ठेवल  जात.तेच कापड पुन्हा वापरून वापरून त्यातून महिलांना जंतुसंसर्ग होतो .आणि मोठ्या प्रमाणात  कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते .अखेर हे सर्व टाळण्यासाठी महिलांनी सॅनिटरी नॅपकिन वापरायला हवेत. ते कसे वापरायचं ? त्याची गरज का आहे  हे पटवून देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे.घरोघरी जाऊन त्यांना सांगितले पाहिजे असे मला वाटते . पाळीदरम्यान जाणारे रक्त हे दूषित असते ? हे सत्य नाही .पाळी दरम्यान होणारा रक्तस्राव हा नॉर्मल रक्तचाच असतो . त्यात काहीही अशुद्ध ,घाण नसते .पाळीमुळे शरीरातील रक्त खूप कमी होते,असे काही म्हणतात,पण  हे चुकीचे आहे.पाळी दरम्यान फक्त 80 मिली इतकाच रक्तस्राव होतो.80 मिली पेक्षा जास्त म्हणजे साधारण 5 दिवसांपेक्षा जास्त रक्तस्राव झाला तरच तो अतिरक्तस्राव असतो . सती ,केशवपन ,हुंडा अशा बुरसटलेल्या रूढी - परंपरांना आपण फाटा दिला. त्या बंद करायला भाग पाडलं मग मासिक पाळीच्या विषयावरच आपण अजूनही मागासलेले विचार घेऊन का जगत आहोत ?


पाळी संदर्भातल्या  त्या जुनाट रूढी -परंपरांच्या बेड्या खरंतर कधीच मोडून टाकण्याची गरज होती ,पण संधी आणि वेळ अजूनही गेलेली नाही .या उद्याच भविष्य जन्माला घालणाऱ्या आजच्या वर्तमानाला तितक्याच पवित्रतेने स्वीकारुयात,त्याचा सन्मान  करूयात !


488 views0 comments