अगस्तीची वार्षिक सभा ऑफलाईन पद्धतीने घ्या !

जेष्ठ शेतकरी नेते दशरथराव सावंत यांची मागणी


प्रविण धुमाळ इंदोरी -  ऊस उत्पादक व सभासदांना नेमकी व समर्पक माहिती मिळण्यासाठी अगस्ती कारखान्याची वार्षिक सभा ऑनलाईन पद्धतीने न घेता ऑफलाइन पद्धतीने घेण्याची मागणी ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांच्यासह ऊस उत्पादकांनी केली आहे.

               सध्या सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने उरकून घेण्याचा सपाटा प्रत्येक सहकारी संस्थेचे संचालक मंडळ व शासनाच्या सहकार विभागाकडून सुरू आहे .मागील वर्षी अगस्ती कारखान्याच्या ऑनलाईन वार्षिक सभेत ऊस उत्पादकांना व सभासदांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाही. त्यामुळे वर्षभर घाम गाळणारे ऊस उत्पादकांचे म्हणणे समजून घेण्याऐवजी अगस्ति प्रशासनाने फक्त ऑनलाईन सभेचे सोपस्कर पार पाडले व त्यात मनमाणी पद्धतीने निर्णय घेतलें. वास्तविक कारखान्याच्या प्रत्येक सभासदाकडे व ऊस उत्पादकाकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, प्रत्येक ठिकाणी मोबाईल नेटवर्क नाही. त्यामुळे सभासदांना ,ऊस उत्पादकांना कारखान्याच्या वार्षिक धोरणांवर मत मांडता येत नाही. परिणामी सत्ताधाऱ्यांच्या कारभाराची माहिती ऊस उत्पादकांना मिळत नाही. प्रसंगी ऑनलाईन मधील तांत्रिक फायदा घेवून जाणकार सभासदांचा आवाजच तांत्रिक दृष्ट्या बंद केला जातो.त्यामुळे ऊस उत्पादकांना सत्ताधाऱ्यांच्या कारभाराची माहिती मिळत  नसल्याने सत्ताधाऱ्यांना मोकळे रान या ऑनलाइन सभेमुळे मिळते .त्याचा परिणाम संस्थेवर कर्ज करून ऊस उत्पादकांच्या हक्काच्या  पैशातूनच चंगळवाद वाढीस लागल्याचे निदर्शनास आल्याने अगस्ती कारखान्याची वार्षिक  सभा ऑनलाईनपद्धतीने न घेता सामाजिक सुरक्षिततेचे नियम पाळून कारखान्याचा समोरील मोकळ्या पटांगणात घेण्याची मागणी श्री. सावंत यांच्या सह ऊस उत्पादकांनी केली आहे. सध्या कोरोनाचा डंका वाजवला जात असला तरी सत्ताधार्‍यांच्या कार्यक्रमात गर्दीचा लोंढा पाहावयास मिळतो .तेथे कोरोणाचे नियम पायदळी तुडवले जातात. मात्र आपल्या भविष्याचे नियोजन करावयाच्या सभेला मात्र कोरोणा नियमांचा बागुलबुवा उभा केला जात असल्याबद्दल उत्पादकांनी खंत व्यक्त केली आहे.याबाबत ऊस उत्पादक व सभासदांच्या मागणीबाबत सकारात्मक भूमिका अगस्ती कारखान्याने घ्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.


148 views0 comments